संत मुक्ताबाई मंदिर
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे तापी आणि पूर्णा नदीच्या पवित्र संगमाजवळ संत मुक्ताबाईंचे समाधी मंदिर आहे.
संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत पूजनीय संत कवयित्री होत्या. त्या संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या धाकट्या भगिनी होत्या. अत्यंत लहान वयात या चारही भावंडांना तत्कालीन कर्मठ समाजाने खूप त्रास दिला. परंतु, मुक्ताबाईंनी या सर्व संकटांना धैर्याने तोंड दिले आणि अत्यंत लहान वयातच अध्यात्मिक प्रगल्भता आणि आत्मज्ञान प्राप्त केले. मुक्ताबाईंचे ‘ताटीचे अभंग’ हे मराठी साहित्यात मैलाचा दगड मानले जातात. या अभंगांमधील “योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा” ही ओळ अजरामर आहे. संतांनी जगाच्या कटू शब्दांकडे दुर्लक्ष करून क्षमाशील कसे असावे, याचे अप्रतिम मार्गदर्शन त्यांनी ज्ञानेश्वरांना (आणि पर्यायाने संपूर्ण जगाला) केले. इसवी सन १२९७ मध्ये (वैशाख वद्य दशमीला), ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथांसोबत तापी नदीच्या तीरावर असताना अचानक प्रचंड वादळ आले आणि विजांचा कडकडाट झाला. या विजांच्या लख्ख प्रकाशात मुक्ताबाई गुप्त (अंतर्धान) पावल्या, अशी वारकरी संप्रदायात श्रद्धा आहे. यावेळी त्यांचे वय अवघे १८ ते १९ वर्षांचे होते. या घटनेच्या ठिकाणी समाधी मंदिर आहे. हे मंदिर वारकरी संप्रदायातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला, तसेच मुक्ताबाईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्याला येथे फार मोठी यात्रा भरते. मुक्ताईनगरहून पंढरपूरसाठी निघणारी संत मुक्ताबाईंची पालखी ही वारकरी पायी वारीतील प्रमुख पालख्यांपैकी एक मानली जाते.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?
विमानाने
जवळचे विमानतळ जळगाव आणि औरंगाबाद
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक भुसावळ
रस्त्याने
मुक्ताईनगर येथून बस उपलब्ध आहे